#
#
#

श्रीमद्भगवद्गीता शास्त्रोक्त उच्चारात अन्वय व अर्थासहित वेबसाईटवर उपलब्ध

निवेदन

श्रीमद भगवद्गीता गीताग्रंथाची महानता निर्विवाद आहे. सदर वेबसाईटसाठी आधारभूत श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे निवेदक माननीय जयदयाल गोयन्दका तसेच आमचे स्वामी माधवानंद यांचे विचार नमूद करू इच्छितो. जगामध्ये श्रीमद भगवद्गीतासारखा कल्याणासाठी उपयोगी ग्रंथ नाही. गीतेमध्ये ध्यानयोग, भक्तियोग इत्यादि पैकी कोणतेही साधन आपापल्या श्रद्धेप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे केल्यामुळे मनुष्याचे त्वरित कल्याण होऊ शकते. त्यासाठी ते म्हणतात की गीतेचे अर्थ व भाव यांसह मनन केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्या साठी आजीवन प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आमचे स्वामी माधवानंद जी म्हणतात भगवानविष्णूंनी आत्मस्थिति प्राप्त करून घेण्याचा मार्ग सांगणारे गीतारूपी वरदान सर्व विश्वाला दिले. भगवान श्रीकृष्णांना गीतेद्वारे अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने सर्व जगाला भक्ति-कर्म- ज्ञान- योग यांचा उपदेश दिला.

वस्तुतः सौ. सुचरीतेच्या देहावसानाच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी आम्ही भावंडानी गीतेचे फोनवर सामुदाईक वाचन केले. ओर्लान्डोच्या शिवमंदिराच्या श्री. स्वामीनी सौ. सुचरीतेच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी एक वर्षभर गीतेचे पठण करण्याचा मार्गही सांगितला होता. फक्त गीतेच्या श्लोकांचे पठण करण्याऐवजी अन्वय आणि अर्थहि समजावून घेतले.आम्ही प्रयत्नपुर्वक गीतेच्या श्लोकांचे पठण आणि अन्वय आणि अर्थाचे अध्ययन नीटपणे पूर्ण केले. तेव्हा असे साहित्य सध्या वेबवर उपलब्ध नसल्याने ते आपण वेबवर उपलब्ध करावयाची तसेच सदर वेबसाईट माझी पत्नी सौ. सुचरीतेच्या स्मृतीस अर्पण करण्याची कल्पना सुचली.

त्यानंतर श्रीमद भगवद्गीता गीताग्रंथाचे प्रकाशक गीताप्रेस, गोरखपुर यांची सदर ग्रंथ वेबसाईट कामासाठी वापरण्याची परवानगी मिळवली.

आमच्या कुटुंबाच्या स्नेही श्रीमती चिडगुपकर यानी नुकतेच गीताधर्म मंडळातर्फे श्री सद्गुरु शंकराचार्य यांच्या मठात जाऊन गीतेचे १८ अध्याय मुखोद्गत म्हणून दाखविले होते. त्यासाठीचा श्री सद्गुरुकडून पुरस्कारही मिळविला होता. त्यामुळे सौ. सुचरीतेच्या नावाने सदर स्थळ करण्याच्या दिशेने आम्ही त्यांना गीतेचे पठण करण्याची विनंती केली. त्यानी ती आनंदाने स्वीकारली. गीतेचे श्लोक, अन्वय व् अर्थ यांचे रेकॉर्डिंग करणे, ते ऐकून दुरुस्ती साठी पुन्हा रेकॉर्डिंग करणे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या गुरु श्रीमती वसुधाताई पाळंदे, श्रीमती कुसुमताई चौधरी, आणि श्रीमती माधवी जोशी यानी मोलाचे सहकार्य केले. गीतेच्या श्लोकांचे पठण त्यांनी केले आहे. तसेच त्यांच्या आवाजातच गीता प्रेसच्या पुस्तकानुसार अन्वय आणि अर्थाचे ध्वनिमुद्रण केले आहे. गीता संथासाठी उच्चारण याविषयी नियम आहेत. ते नियम स्वतंत्रपणे लिखित तसेच ध्वनिमुद्रित केले आहेत.

सदर वेबसाईट चे काम चालू असताना आमचे आदरणीय स्वामी माधवनन्द स्वामी आणि त्यांच्या पत्नी सौ आशाताई यानी सदर वेबसाईट बद्धल सांगितल्यानंतर आनंद व्यक्त केला. स्वामीजींची श्रीमद्भगवद्गीता ग्रंथातील प्रथम तीन अध्यायावर अर्थ- अन्वय तसेच अभ्यासपूर्ण विवेचना सहित ग्रन्थ प्रकाशित झाले आहेत. चतुर्थ ग्रंथाचे काम चालू आहे.ते उपलब्ध होताच स्वामीजींच्या शब्दात अन्वय व अर्थ पुढील टप्यात वेब साईटवर टाकले जातील.

आपल्याप्रमाणेच इतरांनाहि श्रीमद्भगवद्गीता श्लोकांचे पठण आणि अन्वय आणि अर्थाचे अध्ययन करण्यासाठी मदत व्हावी अशा हेतूने आपण हा उपक्रम योजिला आहे.त्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतर हितचिंतक यांची बरीच मदत मिळाली आहे. त्याच्या पुस्तकातील अन्वय आणि अर्थ वापरण्यासाठी गीता प्रेस यांनी परवानगी दिली. त्यासाठी मी गीता प्रेस, गोरखपुर यांवेबसाईट यांचे मनःपूर्वक आभार मानतो. वेबसाईट साठी आमचे नातलग प्रसाद चितळे व हर्षा बेन्नूर यानी आपला अमूल्य वेळ तर दिलाच व या विषयातील त्यांच्या संगणकीय कौशल्याचा उपयोग केला माझी बहिण स्नेहलता तावरे हिने या सर्वांच्या कामाचे समन्वय करण्याचे काम केले आहे. यांचे नाम निर्देश करणे मी माझे कर्तव्य समजतो. हे सर्व रेकॉर्डिंग चांगले व्हावे या हेतूने प्रोफेशनल स्टूडियोच्या मदतीने करून घेतले आहे. सर्व श्लोकही वेबवर घालता येण्यासाठी देवनागरी लिपीत युनिकोड साचा वापरून लिहून घेतले आहेत आणि तसेच ते html मध्ये तयार करून घेतले जात आहेत. गीतेचे श्लोक, अन्वय आणि अर्थ यांचे लिखित आणि ध्वनिमुद्रित घटक एकत्र केले आहेत प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांना कॉम्पुटरच्या पडद्यावर एक-एक श्लोक दिसेल आणि त्याबरोबर त्या श्लोकाचे पठण ऐकता येईल . तसेच त्यांच्या आवडीनुसार क्रमाक्रमाने श्लोक, अन्वय आणि अर्थ वाचता अथवा ऐकता तसेच तसेच संस्कृत व्याकरण आणि उच्चार याविषयीचा लेखही त्याचप्रमाणे पडद्यावर दिसू शकेल आणि आणि ऐकताही येइल . कृपया आपले नाव व इ-मेल चा पत्ता नोंदवा म्हणजे तुम्हास वेब साईट तयार झाल्याची माहिती कळविता येईल. धन्यवाद!

आपला नम्र,
निळकंठ ढेरे, e-mail: neelkanth@sucharita.org